नाशिक। दि. २६ जून २०२५: नाशिक जिल्ह्यात बुधवारी पावसाने विश्रांती घेतली. सकाळी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस वगळता उघडीप होती. २४ तासांत अवघ्या एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र उद्यापासून पावसाला अनुकूल वातावरण असल्याने नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
मोसमी नैऋत्य वाऱ्यांनी ९० टक्के देशाचा भाग व्यापला असून आता केवळ राजस्थान, हरियाणासह पंजाबमधील अवघ्या काही भागात तो पोहोचायचा आहे. राज्यातील आगामी तीन दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पाऊस राहणार असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.