Amazon

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

मुंबई। दि. १९ ऑक्टोबर २०२६: राज्याच्या दक्षिण भागातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी वादळी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांसह मराठवाड्यातही पावसाची नोंद झाली. या पावसामुळे दक्षिण महाराष्ट्रातील कमाल तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून, पुढील दोन दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता वाढली आहे. सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी राहिले. त्यातच ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या काही भागांत पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दोन दिवसांच्या घसरणीनंतर तापमानात पुन्हा वाढ; पावसाचा अंदाज ठरला फोल

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. आग्नेय दिशेकडून वाहणारे वारे बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात बाष्प मध्य आणि पश्चिम भारताच्या दिशेने आणत आहेत. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढून काही ठिकाणी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या पावसाचे वितरण सर्वदूर नसून काही भागांतच दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी सरी बरसत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याआधी नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन !

कोल्हापूर, सांगलीसह मराठवाड्यात पावसाची नोंद:
रविवारी नोंदविण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, कोल्हापूर येथे ७.७ मिलिमीटर, सांगली येथे ५.५ मिलिमीटर, बीड येथे २.३ मिलिमीटर, छत्रपती संभाजीनगर येथे २ मिलिमीटर, धाराशिव येथे २ मिलिमीटर, हिंगोली येथे १.९ मिलिमीटर, तर लातूर येथे २.६ मिलिमीटर पाऊस झाला. दुसरीकडे, विदर्भातील बहुतांश भागांत हवामान कोरडे होते. सोमवारी नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये राज्यातील पहिले ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ सुरू; आता २४ तास मिळणार धान्य!

हिवाळ्यातही तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता:
दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. डिसेंबरपर्यंत ही स्थिती अधिक तीव्र होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदाच्या हिवाळ्यातही तापमानात चढ-उतार होण्याची आणि काही काळ उबदार हवामान जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडीचा अनुभव कसा राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790