नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सलग चार दिवस ४० अंश सेल्सिअसपर्यंत असलेल्या कमाल तापमानात शुक्रवारी किंचित घट झाली. कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरताना उष्ण वाऱ्याचा वेग वाढला. प्रतितास ५.४ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने नाशिककरांना प्रचंड उकाडा जाणवला, तर पुन्हा हवामानात बदल होत पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. परिणामी, कमाल तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्द्रतेची टक्केवारी पुन्हा वाढू शकते. आज (दि. २०) सकाळी २४.३ इतक्या किमान अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर काल दिवसभर २५ टक्के आर्द्रता होती. त्यामुळे नाशिकमध्ये शुक्रवारी दिवसभर काहीसा उकाडा जाणवला.
दरम्यान, सलग चार दिवस उष्णतेच्या झळांमुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांना पुढील दोन दिवस दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोमवारपासून पुढील चार दिवस पुन्हा तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.