नाशिक। दि. १६ जुलै २०२५: राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. असातच हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील काही भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणासह, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, समुद्रसपाटीपासून घाटमाथ्यांपर्यंत हवामानात मोठे बदल दिसून येतील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण परिसरात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाटमाथ्यांवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे, महाबळेश्वर, खंडाळा, मुळशी अशा ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
लोणार तालुक्यात अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली, बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात काल सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रा या गावात पावसाचे पाणी शिरलं. गावात पावसाचे पाणी शिरल्याने काही घरांचे हे नुकसान झाल्याची माहिती आहे.