नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अपुरा पाऊस व मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने शहरात जवळपास वीस दिवसांचा पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्याअनुषंगाने पाण्याची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेनेच आताच नाशिककरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देताना पाणीकपातीचे संकटही येवू शकते, असे संकेत दिले आहेत.
मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगरच्या धरणांतून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. १५ आॉक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणे धरणातून १६०० तर दारणा धरणातून १०० असे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती.
परंतु, जायकवाडीला पाणी सोडल्याने महापालिकेला केवळ ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळाले. उपलब्ध पाणी आरक्षण ३१ जुलै २०२४ पर्यंत पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी विभागनिहाय उपअभियंत्यांचे भ्रमणध्वनीदेखील जाहीर केले.
परंतु त्याचबरोबर महापालिकेमार्फत जमिनीखालील टाकी, तळमजल्यापर्यंतच पाणीपुरवठा करण्यास बांधिल असल्याने वरच्या मजल्यावरील पाण्यासंदर्भात तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याचबरोबर तक्रार करताना पाणी मीटर चालु असणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा तक्रारीची दखल घेतली जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
बचतीसाठी महत्त्वाच्या सूचना:
काटकसरीने पाणी वापरावे.
पाणी शिळे होत नाही त्यामुळे उरलेले पाणी फेकू नये.
स्नानासाठी शॉवर वापरू नये.
पाणी टाक्या ओव्हरफ्लो होवू देवू नका.
साठवणूक टाक्यांकरीता बॉलव्हॉल्व व सेंसरचा वापर करावा.
वाहने धुऊ नये, रस्त्यावर सडा मारू नका.
नळ जोडणीला थेट मोटर किंवा पंप बसवू नये.
पाणी साठविण्यासाठी जमिनीत टाकी बांधावी.
कमी वापर, पुनर्वापर, पुनर्प्रकियेचा अवलंब करावा.