जयेश साबळे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप
नाशिकच्या द्वारका भागात दोन गटांत झालेल्या दंगलीत आकाश रंजवे ह्या युवकाचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्याने तणाव निवळळा होता. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या द्वारका भागातील वडाळा नाका येथील महालक्ष्मी चाळ येथे रात्री सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन गटांत भांडण झाले. यावेळी दोन गटात बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. याचं पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत धारदार शस्रांच्या हल्ल्यात एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आकाश रंजवे असे या घटनेत खून झालेल्या युवकाचे नाव आहे.. यावेळी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वडाळा नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे तर इतर संशयितांच्या शोधासाठी पथक नेमण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव निवळला होता. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय द्यावा या मागणीसाठी मंगळवारी मयत आकाश रंजवे याच्या नातेवाईकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
विशेष म्हणजे ह्या गुन्ह्यातील काही संशयित हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून नाशिक पोलिसांनी त्यांना तडीपार केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे तडीपार म्हणून पोस्टर देखील पोलीसांनी लावलेले आहेत, तरी देखील तडीपार गुन्हेगार शहरात येऊन असे कृत्य कसे काय करतात असा प्रश्न निर्माण होत आहे. तर पोलिसांच्याच कामावर यामुळे प्रश्न निर्माण होतोय. या खुनाच्या घटनेबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत अधिक तपास सुरू आहे.