नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मतदानाची गोपनियता राखण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल फोन, सॅटेलाईट फोन तसेच वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध केला आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिल्या आहेत.
मोबाईल किंवा अन्य साधनांचा वापर करून मतदारांवर धाकदपटशा, दडपशाही केली जाऊ नये यासाठीही मतदान केंद्रात मोबाईल वापरास बंदी सक्त मनाई केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी, मतदान यंत्रात बिघाड इत्यादी तातडीच्या कामकाजासाठी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी यांना केवळ मोबाईल वापर अनुज्ञेय आहे.
या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती मतदान केंद्रात मोबाईलचा गैरवापर करतांना आढळल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 व भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी आदेशित केले आहे. मतदारांनी वरील सूचनांचे पालन करून मतदान करावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.