नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): खंडणीखोर वैभव देवरे याच्याविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपाचे पदाधिकारी जगन पाटील यांनी २० लाखांच्या कर्जापोटी देवरे याने त्यांची तब्बल ३ कोटींची स्थावर मालमत्तेवर कब्जा करीत त्यांची फॉर्च्युनर कारही ओढून नेत मारहाण केली. तर, सिडकोतील भिक्षुकी करणाऱ्या सर्वसामान्य कुटूंबियांचे राहते घर बळकावत त्यांच्याकडून अव्वाचे सव्वा पैसे वसुल केले.
जगन पाटील (रा. नयनतारा, गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित देवरे व ते एकाच तालुक्यातील असल्याने ओळख होती. पाटील यांनी बंगल्याच्या बांधकामासाठी त्याच्याकडून २० लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजाने घेतले. मात्र, संशयित देवरे याने व्याजाची रक्कम वेळेत न आल्याने ४० लाखा केली.
देवरे याने पाटील यांचा लेखानगर येथील प्लॉट बळजबरीने संशयित गणेश जगन्नाथ जाधव याच्या नावावर केला. इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीतील त्याच्या मुलीच्या नावावर असलेला फ्लॅट देवरे याने बळजबरीने त्याची पत्नी सोनल देवरे हिच्या नावा केला. ध्रुवनगर येथील बंगलो रोहाऊसचे साठेखत करून घेत त्याचा कब्जा घेतला.
वडिलोपार्जित टेंभे (ता. सटाणा) येथील ३८.२५ आर जमीन देवरे याने त्याची सासू सीमा नामदेव पवार हिच्या नावावर खरेदी करून घेतली. एवढे करून ८५ लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी पाटील यांनी त्यांचा बंगला दीड कोटीला विकला. त्यातील ५३ लाख ५० हजार रुपये त्याने बळजबरीने काढून घेतले.
त्यानंतरही त्याने संशयित गजानन केटर्स, साईनाथ निकम, छाया संजय देवरे, महेश गयाजी खैरनार, रेखा पोपट जाधव, संजय पोपटराव देवरे, दिनेश प्रकाश पाटील मनुमाता ऑटो केअर यांच्या खात्यावर ४२ लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. त्यानंतर घरी येऊन धमकावून पाटील यांची फॉर्च्युनर कार (एमएच १५ इआर १११) घेऊन जाऊन मारहाण केली व ५० लाखांची खंडणी मागितली.
न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी देवरे याच्यासह सोनल देवरे, गजानन केटर्स, साईनाथ निकम, छाया संजय देवरे, महेश गयाजी खैरनार, रेखा पोपट जाधव, संजय देवरे, दिनेश पाटील, मनुमाना ऑटो केअर, सीमा नामदेव पवार यांच्याविरोधात इंदिरानगर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिक्षुकाचे घरच बळकावले:
प्रदीप यादव बुवा (रा. जयराम ब्लोसम, महाजन नगर, सिडको) यांनी कोरोनात अडचणी आल्याने देवरेकडून ३ लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र व्याजाची रक्कम वेळेत न देता आल्याने देवरे याने त्यांच्याकडे ४० लाखांची मागणी केली.
त्यांना धमकावून देवरे याने त्यांचे राहते घर स्वत:च्या नावावर खरेदीखत करून घेतले. याप्रकरणी वैभव देवरे, त्याचा साला निखिल नामदेव पवार (रा. राणेनगर) यांच्याविरोधात विविध कलमान्वये इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२०/२०२४)