नाशिक (प्रतिनिधी): चांदोरी शिवारातील नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दोन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर हल्ला चढविला. यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी, नागापूर, शिंपी-टाकळी शिवारात बिबट्याचा संचार असून, छत्रपती संभाजीनगर ते नाशिक राज्य मार्गावरून नाशिककडून चांदोरी सुकेणेकडे दुचाकीवरून हर्शल बाळासाहेब चिखले (वय २९), भाची जानवी रानडे (१५) व अनन्या रानडे (१२) जात होते. चांदोरी शिवारात वीज उपकेंद्राजवळील महाराजा हॉटेल येथे राज्य मार्ग ओलांडणाऱ्या दोन बिबट्यांनी त्यांच्यावर झडप घातली व तिघांवर जीवघेणा हल्ला केला.
यात गंभीर जखमी झालेले हर्शल चिखले यांनी सांगितले, की हल्ला झाल्यानंतर दुचाकीवरून जमिनीवर खाली कोसळले.
डोके, हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या. जखमींना तत्काळ चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. याबाबत वन विभागाला सोमवारी (ता. १४) माहिती मिळाली.
दुपारी दोनला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, मनमाडचे वनपाल भगवान जाधव, वनरक्षक राजेंद्र दौंड यांच्यासह निफाडच्या वन विभागाने घटनास्थळी व मौजे सुकेणे येथील चिखले यांच्या वस्तीला भेट देत पंचनामा केला.
हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती स्थिर असून, या घटनेमुळे मौजे सुकेणे, चांदोरी व नागापूर शिवारात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.