नाशिक। दि. १ जुलै २०२५: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र ‘अ’ वर्ग दर्जा देण्याबाबत २७ मार्चला शासन आदेश जाहीर झाला होता. त्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी (दि. ३०) केली. त्यामुळे त्र्यंबक विकासासाठी देश-विदेशातील देणगीसह नगरपरिषदेला पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधीही मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. सिंहस्थात भाविकांना उच्च सुविधांसाठी मदत होईल. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स (ट्विट) या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
⚡ स्थानिक रोजगार वाढणार, पर्यटनालाही फायदा
👉 केंद्र व राज्य शासनाकडून पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी मिळेल.
👉 रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, टॉयलेट, पार्किंगसह विद्युत सुविधा उच्च दर्जाच्या बनविण्यास निधी मिळेल.
👉 पर्यटन वाढल्यानंतर स्थानिक रोजगार निर्मिती वाढेल. त्यामुळे स्थानिक तरुणांना हॉटेल, वाहनसेवा, हस्तकला विक्री, रेस्टॉरंट फूड स्टॉल इत्यादीतून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
👉 कृषी-उद्योगांना चालना मिळेल.
👉 हॉटेलिंग आणि लॉजिंग उद्योगात वाढ होताना अनेक गुंतवणूकदार आणि व्यावसायिक पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करतील. 👉 उच्च दर्जाची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे सुरू होतील.
👉 पर्यटनावर आधारित स्टार्टअप सुरु होतील.
👉 ट्रॅव्हल अॅप्स, गाइडसेवा, स्थानिक अनुभवांवर आधारित पॅकेजेस अशा अनेक नव्या व्यवसायांना संधी मिळेल.
👉 धार्मिक व सांस्कृतिक वारसा संवर्धनाबरोबरच जुने मंदिरे, घाट, कुशावर्त कुंड, ब्रह्मगिरी फेरी मार्ग व इतर दुरुस्ती व संवर्धनासाठी सरकार विशेष प्रयत्न करू शकेल.