नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): चोरीच्या एका गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे हा पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला धक्का देत सुरक्षाभिंतीवरून उडी घेऊन पळून गेला.
मंगळवारी (दि. १९) सकाळी ही घटना इंदिरानगर पोलिस ठाण्यात घडली. या घटनेने इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाची धावपळ उडाली. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत होते.
मात्र, तो उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे (२०, रा. म्हसोबा मंदिराजवळ साठेनगर, वडाळा गाव) यास गुन्हे शोध पथकाचे युनिट रचे उपनिरीक्षक संजय पाडवी यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
सोमवारी (दि. १८) इंदिरानगर पोलिस ठाण्यात विशाल याला आणण्यात आले. त्यानंतर गुन्हा तपास करणारे रात्रपाळीचे पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर देवरे यांनी नऊ वाजता संशयित तीनबोटे यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी सुरू केली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याला अटक दाखविण्यात आली. त्यानंतर त्यास अंबड पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये टाकण्यासाठीची तयारी इंदिरानगर पोलिसांनी सुरू केली होती.
हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी संशयित विशाल याने पोलिसांकडे पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यास देवरे यांनी पोलिस ठाण्याच्या मागील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पाण्याच्या कूलरजवळ घेऊन गेले. देवरे हे त्याला पाणी देत असताना त्याने जोराचा धक्का दिला. काही क्षणात पोलिस ठाण्याच्या सुरक्षाभितीवरून उडी घेत धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.