नाशिकचा पारा ४१.२ अंशांवर; दिवसा चटका-रात्री उकाडा !

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या दोन वर्षांमध्ये यंदाचा एप्रिल महिना नाशिककरांसाठी सर्वात उष्ण ठरला आहे. एप्रिलअखेर दोनदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककरांना करावा लागला.

हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान रविवारी (दि.२८) शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेठरोडवरील हवामान केंद्रात नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना दिवसभर प्रखर उन्हाचा चटका जाणवल्याने झळा असह्य झाल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

पंधरवड्यापूर्वी मंगळवारी (दि.१६) सायंकाळी नाशिक शहरात कमाल तापमानाचा पारा थेट ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. यापेक्षा जास्त कमाल तापमान आतापर्यंत नोंदविले गेले नव्हते. त्यावेळी सलग चार दिवस कमाल तापमान हे ४० पार स्थिरावत होते. रविवारी कमाल तापमान ४१ अंशाच्याही पुढे सरकले. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. घरातसुद्धा नागरिकांना उष्मा जाणवत होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

किमान तापमानदेखील २४ अंशापुढे सरकल्यामुळे नाशिककरांना रात्रदेखील ‘हॉट’ झाली आहे. यंदा एप्रिलअखेर दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककर करत आहेत. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठाही रविवारी ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

रात्रीसुद्धा फुटतोय घाम:
कमाल तापमानासोबत किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. यामुळे नाशिककरांना रात्रीसुद्धा घरात घाम फुटत आहे. दोन्ही प्रकारच्या तापमानाचा आलेख चढता राहिल्याने नागरिकांना झळा असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान मोजले गेले.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

यंदा २०१९चा उच्चांक मागे पडणार ?:
नाशिक शहरासाठी २०१९ हे वर्ष मागील दशकभरात सर्वाधिक उष्ण राहिले होते. २८ एप्रिल २०१९ साली दहा वर्षातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान शहरात मोजण्यात आले होते. त्याचवर्षी शहरात पावसाचे प्रमाणदेखील सर्वाधिक १,२३४.४ मिमी इतके राहिले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790