नाशिक (प्रतिनिधी): यंदाच्या वर्षी हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरी ५० टक्केच पाऊस पडलेला आहे. त्यामुळे जमिनीवरील आर्द्रता कमी झाली असून हवा कोरडी झाली आहे. त्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जमीन लवकर तापत असल्याने राज्यभरात उष्णतेची लाट निर्माण होत आहे. मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सियस, त्यापाठोपाठ मुंबई, जळगाव, चंद्रपूर, सोलापुरात ३८ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
उत्तर महाराष्ट्रातही तापमानात वाढ झाली असून नाशिकमध्ये मंगळवारी पारा नागपूरच्या (३७.६) बरोबरीने ३७.५ अंश सेल्सियसवर गेला होता. आगामी तीन दिवस हवामान कोरडे व कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यावर्षी हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरी ५० टक्केच पाऊस पडलेला आहे. त्यामुळे जमिनीवरील आर्द्रता कमी झाली असून हवा कोरडी झाली आहे. त्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जमीन लवकर तापत असून उष्णतेची लाट निर्माण होत आहे. सुरुवातीला उष्णतेची लाट ही कोकण, गोवा परिसरात होती परंतु मंगळवारपासून ती विदर्भातदेखील निर्माण झालेली आहे. मराठवाड्यात सरासरी तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सियस असल्याचे हवामान खात्याने सांगितले.