नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि पद्मविभूषण गानसरस्वती किशोरीताई आमोणकर गांच्या गायकीवर अभंग, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय गायनाचा अनोखा स्वराविष्कार येत्या शनिवारी २७ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता कालिदास कला मंदिरात सादर होणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दोन सुप्रसिद्ध गायक विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे आपल्या गायनातून किशोरीताई आणि भीमसेनजींच्या गायकीतून उतरलेली प्रसिद्ध पदे सादर करतील. ‘सवाईगंधर्व’ निर्मित आणि व्यास क्रिएशन्स प्रकाशित “स्वर सवाई” या अभंग, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय गायनाचा अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती अभिनेते आकाश भडसावळे यांची असून फ्रेंड्स सर्कलचे विशाल जयप्रकाश जातेगावकर यांच्या माध्यमातून आयोजन केले गेले आहे.
जयपूर आणि किराणा घराण्याची गायकी सांगणारे दोन ज्येष्ठ गायक विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि पंडित आनंद भाटे आपल्या स्वतंत्र आणि सुश्राव्य गायकीने सुरुवात करून त्यानंतर या दोन भिन्न पण मनाला भिडणाऱ्या गायकीचा एकत्रित आविष्कार ऐकायला मिळणार आहे. न भूतो न भविष्यति अशा या विशेष कार्यक्रमाचा पहिला आणि एकच शो नाशिकमध्ये सादर होणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूरदर्शन वरील प्रसिद्ध वृत्त निवेदक अमेय रानडे करणार आहेत.
भारतरत्न पंडित भीमसेनजी आणि पद्मविभूषण किशोरीताई यांचा वारसा सांगणाऱ्या या दोन सुप्रसिद्ध गायकांना आपल्या भिन्न गायकीचे दर्शन घडवताना प्रथमच रंगमंचावर एकत्र ऐकण्यासारखे सुख नाशिककर प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन अनुभवतील! ‘सवाईगंधर्व’ ची निर्मिती असलेल्या ‘व्यास क्रिएशन्स’ प्रकाशित दोन सवाई स्वरांचा “स्वर सवाई” कार्यक्रम नक्की अनुभवा.
या कार्यक्रमाची तिकिट विक्री ऑनलाईन bookmyshow वर सुरू (https://in.bookmyshow.com/events/swar-sawaai/ET00391786) असून 8275442370 या क्रमांकावर प्रि-बुकिंग सुरू आहे. नाट्यगृहात तिकिटे रविवार 21 पासून उपलब्ध होतील.