नाशिक (प्रतिनिधी): नाशिकहून सुरतसाठी स्पाइस जेट २८ मार्चपासून विमानसेवा सुरु करणार असल्याने आता सुरतला अवघ्या एक ते दीड तासात पोहचता येणार आहे. आठवड्यातील सोमवार ते शनिवारपर्यंत ही सेवा दिली जाणार आहे. स्पाइस जेटकडून सध्या सुरू असलेल्या हैदराबाद-नाशिक सेवेचाच याकरिता विस्तार करण्यात आला असून आता हैदराबाद-नाशिक-सुरत या परतीच्या मार्गावर ही सेवा उपलब्ध होणार असल्याने याचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिकांना होणार आहे,
नाशिक विमानतळावरून सध्या दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, बेळगाव, पुणे या देशातील प्रमुख शहरांकरिता विमानसेवा सुरू असून लवकरच कोलकात्याकरिताही सेवा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. सुरत ही मोठी कपड्यांची त्यातही साड्यांची तसेच हिऱ्यांची बाजारपेठ असून नाशिक जिल्ह्यातील या क्षेत्रातील हजारो व्यावसायिकांचा नियमित सुरत प्रवास होत असतो, रस्तेमार्गाने यासाठी किमान पाच तास लागतात. त्यामुळे आता या नव्या सेवेने या व्यावसायिकांचा मोठा वेळ व खर्चही वाचू शकणार आहे. यामुळे इतर सेवांप्रमाणेच या नव्या सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.