नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर मळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी दिसणारा बिबट्या अखेर बुधवारी (दि. २९) रात्री ९ वाजेदरम्यान बजरंगनगर परिसरातील पिंजऱ्यात कैद झाला.
यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी परिसरात आणखी दोन बिबटे असण्याच्या शक्यतेने वनविभाग येथे पुन्हा पिंजरा लावणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून शहरातील विविध भागांमध्ये बिबट्या दिसून येत आहे. सावतानगर, गोविंदनगरमधील बिबट्याची चर्चा अजूनही ओसरली नसताना अंबड, मखमलाबादलाही बिबट्या दिसून आला आहे. त्यातच आता सातपूरलगतच्या योगेश आहेर व निगळ मळा, अण्णाचा मळा दादोबारोड, बजरंगनगर येथे सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर कैद झाल्याने परिसरात भीती पसरली होती. त्यामुळे या परिसरात पिंजरा देखील लावण्यात आला होता.
त्यात एक बिबट्या अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी पुन्हा पिंजरा लावणार असल्याचे वनरक्षक अनिल अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात हॉटेल, ढाबे, मटन मार्केट, मच्छी विक्रेते असल्याने बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी वासाने येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
![]()


