नाशिक (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 25 नोव्हेंबर 2024 पासून वाहनधारक नागरिकांसाठी पसंती क्रमांसाठी ऑनलाईन सुविधा https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक पहिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत यापूर्वी वाहन मालकास वाहनासाठी पंसतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करण्यासाठी विहीत शुल्क अदा कार्यालयात प्रत्यक्ष डी. डी. द्वारे अदा करून पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध होती. परंतु आता ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या पसंती क्रमांकासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच पसंतीचा क्रमांक आरक्षित करताना निर्धारित शासकीय शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन सुविधा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून अर्जदारास त्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर येणारा ओ.टी.पी. https://fancy.parivahan.gov.in संकेतस्थळावर नोंदवून पंसतीचा क्रमांक आरक्षित करून त्याची प्रत संबंधित वाहन वितरक यांना नोंदणी क्रमांक जारी करण्यासाठी वाहनधारक नागरिकांनी द्यावयाची आहे. तथापि, सद्यस्थितीत वैयक्तिक मालकीच्या वाहना व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहन मालकास आकर्षक नोंदणी क्रमांक पूर्वीप्रमाणेच कार्यालयामार्फत जारी करण्यात येणार आहे. वाहन मालिका सुरू करतेवेळी कार्यपद्धी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. एका पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास कार्यालयात लिलाव करून पसंती क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.