समृद्धी महामार्गावर 4975 वाहन चालकांवर परिवहन विभागाची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असलेल्या शिर्डी ते भरवीर मार्गिकेवरील अपघात रोखणे व सुरक्षितेच्या दृष्टीने 26 मे ते 31 जुलै, 2023 या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक कार्यालयाच्या वायुवेग पथकाने 4 हजार 975  वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गावरील शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर मार्गावर अपघात रोखण्यासाठी,  वाहन तपासणी व वाहन चालकांचे समुपदेशन करण्यासाठी  नाशिक प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कक्ष  स्थापित  केला असून एन्ट्री व एक्सीट ठिकाणावर याकामी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांद्वारे वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

यात वाहनाचे टायर, वाहनातील अतिरिक्त प्रवासी, वाहनांनुसार लेन तपासणी, अनधिकृतपणे उभी केलली वाहने, Drunk and Drive बाबत ब्रेथॲनालायझरद्वारे तपासणी इत्यादी बाबींची तपासणी केली जाते. ठराविक वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांसाठी सॉप्टवेअर विकसित करण्यात आले आहे. याद्वारे वाहन अतिवेगात असेल तर ते शोधले जाते.

26 मे ते 31 जुलै 2023 या कालावधीत वायुवेग पथकाने केलेली कारवाई:
समृद्धी महामार्गावर वाहनाचे टायर अथवा वाहनाची योग्यता समाधानकारक आढळून न आल्याने प्रवेश नाकराण्यात आलेली 4252 वाहने, अतिरिक्त प्रवासी आढळून आलेली 305 वाहने, वाहनांना परावर्तक (रिप्लेव्टीव्ह टेप) न बसवलेली 119 वाहने, चुकीच्या मार्गिकेतुन वाहन चालविणारी (Wrong Lane) 158 वाहने, समृद्धी महामार्गावार अनधिकृतपणे उभी केलेली  110 वाहने व विहित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने चालणारी 31 वाहने अशी एकूण 4 हजार 975 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सर्व वाहनचालकांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटकोर पालन करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790