नाशिक (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्या वायूवेग पथकांच्या माध्यमातून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई केली जाते. सन २०२४ मध्ये एकूण ४३४२ वाहन तपासणी केली. त्यात २४६ वाहन चालक दोषी आढळून आले.
दोषी वाहन चालकांच्या एका प्रकरणात मा. न्यायालयाने ३७ हजार ५०० रुपये दंड केला असून वाहन चालकास कोर्ट उठेपर्यंत न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
अल्पवयीन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध वारंवार मोहीम राबविण्यात येतात. १८ वर्षांखालील अल्पवयीन युवक, युवतींना कोणतेही वाहन चालविण्याचा गुन्हा केल्यास मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांतर्गत दोषी ठरविण्यात येऊन वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करता येत नाही. तसेच गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या पालकांना ३ वर्षे कारावास व रुपये २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे कारवाई दरम्यान, दोषी आढळलेल्या ८ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आल्याने मा. न्यायालयाने सदर चालकांस व पालकास प्रत्येकी ३० ते ३२ हजार रुपये दंड केला आहे.
त्यामुळे मद्यप्राशन करून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. तसेच १८ वर्षांखालील अल्पवयीन युवक- युवतींनी कोणतेही वाहन चालवू नये व पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहने चालविण्यास देऊ नये. कारवाईदरम्यान दोषी आढळलेल्यांना वरीलप्रमाणे कारवाईस सामोरे जावे लागेल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले आहे.