स्मार्ट सिटीमध्ये नाशिक शहर राज्यात क्रमांक एक वर; देशात १५ वर

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक स्मार्ट सिटीने मुसंडी मारत राज्यात पहिला तर देशात १५ वा क्रमांक पटकावला आहे. गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे मिशन स्मार्ट सिटी संदर्भात रँकींग जाहीर केले जाते. त्यानुसार दि.21\08\2020 रोजी स्मार्ट सिटी मिशनच्या पोर्टलवर देण्यात आलेल्या रँकींगमध्ये नाशिक स्मार्ट सिटीने मुसंडी मारली आहे. देशात सुरूवातीच्या ३९ क्रमांकावरून १५ व्या क्रमांकावर तर राज्यात प्रथम येत पुणे व नागपूरलाही मागे टाकले आहे.सदर रँकींग ह्या प्रत्येक आठवड्यात शहरांनी सादर पोर्टलवर सादर केलेल्या माहितीनुसार अद्ययावत होत असतात.

स्मार्ट सिटी योजनेमध्ये राबविण्यात येत असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे सचिव तथा मिशन डायरेक्टर यांच्या स्तरावर वेळोवेळी आढावा घेण्यात येत असतो. या व्यतिरिक्त देशभरातील १०० स्मार्ट सिटीजचे मुल्यांकन करणेकामी केंद्र शासनाने पोर्टल विकसीत केले असून त्याद्वारे सर्व स्मार्ट सिटीजचे मुल्यांकनासंदर्भात एक सूत्रबद्ध यंत्रणा बनविण्यात आली असून त्याद्वारे सदर मुल्यांकन वेळोवेळी करण्यात येते. सदर मुल्यांकनाच्या सूत्रामध्ये पूर्ण झालेले प्रकल्प, काम सुरू असलेले प्रकल्प, निविदा प्रक्रीयेत असलेले प्रकल्प तसेच संबंधित स्मार्ट सिटीस एकूण प्राप्त निधीपैकी खर्च करण्यात आलेला निधी इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. 

सद्यस्थितीतील प्रकल्पांमध्ये एकूण ५२ प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, त्यामध्ये स्मार्ट सिटी निधी, सार्वजनिक खासगी भागीदारी, सीएसआर तथा कन्वर्जन्स इत्यादी प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच स्मार्ट सिटी निधीतील ५४० कोटींचे ९ प्रकल्प सध्या सुरू आहेत, ४ प्रकल्प निविदा प्रक्रीयेमध्ये आहेत आणि उर्वरीत प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सूरू आहे.

गोदा विकास प्रकल्पांतर्गत गोदा सौंदर्यिकरण प्रकल्पातील गोदा पार्कचे काम सुरू असून त्यात ॲम्पी थिएटर, भुमिगत पाण्याची टाकी, हेरिटेज वॉल इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. गोदा सिव्हिल प्रकल्पातील मलनिःस्सारण तथा पावसाळी वाहिन्यांची कामे रामकुंड परिसरात हाती घेण्यात आली असून सदर कामे सुद्धा नियोजीत कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर होळकर पुलासमोरील स्वयंचलित गेट बसविण्याबाबतच्या प्राथमिक आराखड्यास सीडीओ मेरीने गेल्याच आठवड्यात मान्यता दिली आहे. सदर काम सुद्धा पावसाळा संपताच सुरू करण्याचे नियोजन आहे. गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये येणाऱ्या पानवेली तसेच निर्माल्य साफ करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून ट्रॅश स्कीमर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे नदीपात्रातील साफ सफाई करण्यात येत आहे. तसेच नदीतील गाळ काढण्याबाबतही प्रकल्प राबविण्यात येत असून त्याची प्राथमिक तयारी झाली आहे. यंदा पावसाळा संपताच सदर कामासही सुरूवात होईल. वर उल्लेखित प्रकल्पांमुळे गोदावरी नदीचे खऱ्या पावित्र्य राखले जावून स्मार्ट सिटी योजनेचा मूळ हेतू साध्य होण्यास मदत होत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

नाशिक स्मार्ट सिटीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या नाशिक मखमलाबाद शिवारातील नगररचना योजनेचे काम सुद्धा महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून याबाबतच्या आराखड्याला संचालक- नगररचना महाराष्ट्र राज्य पूणे यांचेकडून नगररचनेच्या आराखड्यास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंर्गत राबविण्यात येत असलेल्या गावठाण क्षेत्र विकास (ABD) या प्रकल्पांतर्गत १७६ रस्त्यांची कामे करण्याचे नियोजित आहे. सदर रस्त्यांवर भुमिगत गटार, पावसाळी गटार तथा भुमिगत विद्युत वाहिन्या व डक्ट इत्यादी कामांचे नियोजन आहे.

नाशिक स्मार्ट सिटी योजनेचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भाग असलेल्या नाशिक सेफ ॲण्ड स्मार्ट सोल्युशन प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटीचे कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर पूर्ण झाले असून पोलीस विभागाचे कमांड कंट्रोल सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. या व्यतिरिक्त प्रकल्पाचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या डेटा सेंटरचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त सदर प्रकल्पाचा भाग असेलेले अन्वायरनमेंट सेंसर व विविध प्रकारचे कॅमेरे बसविणे कामीचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

स्मार्ट सिटी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे स्मार्ट सिटी योजनेमध्ये विविध क्षेत्रातील प्रकल्पांचा अंतर्भाव आहे, जसे की, उर्जा, दळणवळण, पाणीपुरवठा, माहिती व तंत्रज्ञान, शाश्वत विकासाबाबतचे प्रकल्प, नदीकाठांचा विकास व कौशल्य विकास इत्यादी. नाशिक स्मार्ट सिटीने आजपावेतो वरील नमूद प्रत्येक क्षेत्रातील प्रकल्प पूर्ण केला आहे किंवा त्यावर काम सूरु आहे. यातीलच पाणी पुरवठा या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील ३ ESR व १ GSR व संलग्न सुविधा याबाबतची निविदा गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सोलर प्रकल्पांतर्गत  एक हजार किलोवॅटपैकी ३५८ किलोवॅटचे क्षमता असलेले सोलर पॅनल कार्यान्वित झालेले आहेत.अशा प्रकारे विविध प्रकल्पांची कामे प्रगतीच्या विविध टप्प्यांवर असल्या कारणाने, स्मार्ट सिटी योजनेचा मुळ हेतू साध्य करण्यात नाशिक स्मार्ट सिटी बहुतांशी यशस्वी झाल्यामुळे राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा मूळ हेतू हा पायलट प्रोजेक्ट राबविणे आणि त्यानुसार भविष्यात तशाच प्रकारचे प्रकल्प राबविण्यात येणे हा आहे. याचे उत्तम उदाहरण विद्युत श वदा हिनी हे आहे. पर्यावरणाचा विचार करता सदर विद्युत दाहिनी नाशिकच्या अमरधाम येथे बसविण्यात आली होती. कोरोनाच्या काळात सदर विद्युत दाहिनीची मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. सदरचा अनुभव पाहता नाशिक महानगरपालिकेच्या सूचनांनुसार व संचालक मंडळाच्या परवानगीने नाशिक स्मार्ट सिटीने विद्युत दाहिनीच्या पुढील टप्प्याचे कामकाज हाती घेतले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

स्मार्ट सिटी मिशनच्या विविध उपक्रम जसे की, परफॉर्मन्स असेसमेंट सिस्टीम फ्रेम वर्क (PASF) ज्यामध्ये पाणीपुरवठा मलनिस्सारण व घनकचरा व्यवस्थापन इत्यादींबाबत विविध पॅरामिटर्सची माहिती जमा करून ती केंद्र शासनास सादर करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये केंद्र शासन सदर सर्व पॅरामिटर्सच्या धर्तीवर अहवाल प्रसिद्ध करणार आहे. याव्यतिरिक्त इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स, क्लायमेट स्मार्ट सिटीज् असेसमेंट फ्रेम वर्क, म्युनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्स, सिटीझन सेंट्रीक स्मार्ट गव्हर्नन्स, माहिती तंत्रज्ञान विषयक नव्याने येऊ घातलेल्या BIS स्टँडर्ड्स बाबत कामकाज, ट्युलिप, सायकल फॉर चेंज चॅलेंज इत्यादी विविध अभिनव उपक्रमांमध्ये नाशिक स्मार्ट सिटीने कायमच भरीव कामकाज केले आहे.

नाशिक स्मार्ट योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यापासून २५ जून, २०२० पर्यंत तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या काळात नवीन कार्यालय, आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, प्रकल्प व्यवस्थापक कंपनीकडून स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये नमूद केलेल्या सर्व प्रकल्पांबाबत प्राथमिक स्तरावरील सर्वेक्षण इत्यादी सर्व मुलभूत बाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रपोजलमधील पाणी पुरवठा, रस्ते, दळणवळणाची साधने, सोलर प्रकल्प, स्मार्ट स्ट्रीट लाईट्स तसेच इतर पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी करताना अनेक गोष्टींचा जसे की फिजीबिलीटी स्टडी, सविस्तर प्रकल्प अहवाल, निविदा, कार्यारंभ आदेश इत्यादी बाबींची पूर्तता करण्यात आली असून, सद्य स्थितीत काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत, इतर प्रकल्प प्रगतीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

अशा प्रकारे नाशिक स्मार्ट सिटीच्या विविध क्षेत्रांतील काही स्तराव कामे झालेली आहेत, तर काही कामे प्रगतीच्या विविध टप्प्यावर आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790