रानभाजी व राखी महोत्सवात ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन
नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): ग्रामीण भागातील महिला बचत समूहांनी रानावनातून आणलेल्या या नैसर्गिक पद्धतीने उगविलेल्या रानभाज्या आहारासाठी पौष्टीक आहेत. नाशिककरांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक पर्वणी मिळाली आहे. त्यामुळे पंचायत समिती नाशिक याठिकाणी आयोजित रानभाजी व राखी महोत्सवात उपलब्ध रानभाज्या खरेदी करण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
दि. १५ ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पंचायत समिती नाशिक येथे आयोजित रानभाजी व राखी महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी , डॉ.वर्षा फडोळ, दीपक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ग्रामीण भागातील उद्योजक महिलांनी निर्मित केलेल्या उत्पादनांना ई- मार्केटप्लेस सारख्या ऑनलाईन संकेत स्थळांवर उत्पादने उपलब्ध करून देणे हे उमेद अभियानाचे यश असल्याचे सागितले तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील उद्योग करणाऱ्या बचत समूहांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी १०० उमेद मार्ट (विक्री स्टॅाल) उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी शासनाच्या प्रमुख जागा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या विविध महत्वकांशी योजनांचा उल्लेख करीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लडकी योजना, महिला व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी बस प्रवास सवलत योजना, विद्यार्थिनीसाठी मोफत शिक्षण सवलत योजना याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी नानाजी देशमुख पोखरा योजना आणून शेतकरी व महिलांना मोठा लाभ दिला जाईल असेही सांगितले.
महिला बचत गटांचे ६ ब्रांडचे विमोचन:
उमेद अभियनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंसाठी ६ नवीन ब्रांड तयार करण्यात आले असून त्याचे विमोचन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मनुके निर्मितीसाठी – गोल्डन ड्रॅाप, कापडी पिशव्या- रुरल टोटस, ज्वेलरी- शक्ती शृंगार, बाजरी पासून पोष्टिक पदार्थसाठी- मिलेट ब्लिस, कुशन कव्हर- कोझी कॉर्नर, पैठणीसाठी- पाटीलकी या ब्रांडचा समावेश आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील ७५ समूहांचा सहभाग असून त्यांच्याकडे सर्व रानभाज्या जसे करटोली, केना, अळू, आघाडा, काटेमाट इत्यादी रानभाज्या उपलब्ध आहेत. तसेच इतर समूहांनी तयार केलेल्या राख्या, प्रिमिक्स, कुशन कव्हर, वारली प्रिंटींगच्या साडया, लेडीज कुर्ती, बेडशीट, मनुके, बाजरी कुकीज, मसाले, तांदूळ, कडधान्य व खाद्य पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत.
प्रास्ताविकात बोलतांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच गोदा व्हेली कार्ट या ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांची उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक सचिन पवार तर आभार पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी केले. यावेळी तालुक्यातील गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, बचत समूहातील महिला आदि उपस्थित होते. दरम्यान, रानभाजी व राखी महोत्सवास नाशिक शहरातील नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.