नाशिक | दि. २६ ऑक्टोबर २०२५: शहरासह उपनगरांमध्ये शनिवारी (दि.२५) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी एक तासभर जोर धरला, मात्र नंतर त्याचा जोर ओसरला.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, अवघ्या तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या काळात जेलरोड, शरणपुररोड आणि उपनगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान खात्याने सोमवार (दि.२७) पर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या रात्रीही शहरात मध्यम पावसाने हजेरी लावली होती. रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान बरसलेल्या सरींनंतर रविवारी सकाळी वातावरण काहीसे स्वच्छ झाले होते. मात्र, पुन्हा दोन दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. शनिवारी दिवसभर शहरात दमट आणि उकाड्याचे वातावरण राहिले. कमाल तापमान ३०.३ अंश तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
वीजपुरवठा खंडित — नागरिक त्रस्त:
शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सुमारे दीड तास जेलरोड, उपनगर, जय भवानीरोड आणि नारायणबापूनगर परिसरात वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे या भागातील रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचेही चित्र दिसले.
पावसामागील कारण काय ?
पूर्व आणि मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून, त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्हाही या पट्ट्यात असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रही तीव्र होत असून, मंगळवारपर्यंत (दि.२८) ते चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे राज्यभर ढग दाटून येत आहेत आणि अधूनमधून पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
![]()

