नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास केंद्राने मान्यता दिल्यानंतर आता प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींची मान्यता मिळाल्या आहेत. या द्रुतगती रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने सुरू करण्यात येत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगत या मार्गामुळे नाशिक-नगर-पुणे या जिल्ह्यांच्या विकासास मदत होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक-पुणे रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत बैठक झाली. त्यात भूसंपादनास हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत असल्याने वेळेत हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्तीसाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधितांना बैठकीत दिल्या. विशेष म्हणजे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर थेट वाटाघाटीतून शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे. नाशिक, अहमदनगर व पुणे या तिन्ही जिल्ह्यातील विविध १०१ गावांमध्ये १३०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल, अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य प्रकारचा मोबदला वेळेत देण्यात येणार असल्याचे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत सांगितले. प्रतितास २०० किलोमीटर वेगाने ही हायस्पीड रेल्वे धावणार आहे. यात पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळास कार्गो वाहतुकीशी जोडला जाणार आहे. यामुळे वाहतुकाची मोठा प्रश्न सुटणार आहे.
येथे असतील रेल्वे स्टेशन :
नाशिकरोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पळसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभोरे, साकूर, जांबूत, बोटा, आळेफाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण, वाघोली, मांजरी, हडपसर, पुणे अशा १४ स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावरील सर्व स्थानके सोयीयुक्त असावे, असेही भुजबळांनी आदेशित केले.
१६ हजार ३९ कोटी खर्च
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा देशातील पहिलाच मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून २३५ किमी ग्रीन फील्ड सेमी हाय स्पीड डबल लाइन रेल्वेमुळे अवघ्या पावणेदोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे.
इगतपुरी-मनमाडसाठी सेमी हायस्पीड प्रस्ताव
केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे लाइनची रचना करणारे महारेल हे पहिले महामंडळ असणार आहे. या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
नाशिकसह पुणे, अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार गती
औद्योगिक वसाहतीही जोडल्या जाणार
नाशिक-पुणे-अहमदनगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. या रेल्वे मार्गामुळे दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्यास गती येणार आहे. प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र जोडले जाणार आहे. कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे.