नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरातील पळसे येथे गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या विशेष शाखेच्या पथकाने सदरची कामगिरी केली असून, नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश प्रल्हाद आहेर (३९, रा. मगर मळा, एकलहरा रोड, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पळसे परिसरामध्ये गावठी कट्ट्यासह संशयित येणार असल्याची खबर विशेष शाखेचे अंमलदार दत्ता चकोर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पळसे परिसरातील आशीर्वाद बिल्डींगच्या आसपास सापळा रचला. संशयित आहेर हा पायी चालत आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंमलदार भगवात जाधव यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दिलीप सगळे, दत्ता चकोर, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम, भगवान जाधव यांच्या पथकाने बजावली.