नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड पंचक गाव परिसरातील मलनिस्सारण केंद्राजवळ मृत आढळलेल्या त्या व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी कसोशीने तपास घेऊन सदर खून प्रकरणी पिता पुत्रास अटक करण्यात आली आहे.
प्रेमात अडसर होऊ नये म्हणून सदरचा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून याप्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली….
याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील पंचक गाव मलनिस्सारण केंद्राजवळ सोमवार (दि. ११) रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना झाडाझुडपात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. यानंतर पोलिसांनी कसोशीने तपास केल्यानंतर सदरचा मृतदेह हा ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड, (राहणार पंचक) याचा असल्याचे आढळून आले होते. गायकवाड हे रविवार (दि.०३ रोजी बेपत्ता झाले होते व याबाबत तशी फिर्याद त्यांची पत्नी साधना गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यानंतर हा मृतदेह गायकवाड यांचा असल्याचे समजल्यावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुंतोडे, त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे नंदकुमार भोळे, हवालदार असलाक शेख, संदीप पवार, सुभाष घेगडमल, कल्पेश जाधव, रोहित शिंदे, यशराज पोतन, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, गोकुळ कासार, विनोद भोर, निलेश वराडे, किरण आवटी आदींनी कसून तपास घेतला असता सदरचा खून हा पंचक गाव परिसरातच राहणारा कार्तिक सुनील कोटमे (वय १९) याने केल्याचे निष्पन्न झाले.
मयत ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांच्या पत्नीचे व कार्तिक कोटमे याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमात मयत ज्ञानेश्वर गायकवाड यांचा अडथळा येत होता. परिणामी ज्ञानेश्वर गायकवाडचा काटा काढायचा म्हणून कोटमे हा त्याच्या काही मित्रासह गायकवाड याला पंचक परिसरात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ घेऊन गेला व त्याठिकाणी ज्ञानेश्वर गायकवाड याचा धारदार हत्याराने खून केला.
त्यानंतर कार्तिक कोटमे हा त्याठिकाणाहून पळून आला व दुसऱ्या दिवशी त्याने आपले वडील सुनील कोटमे यांना घडलेली या हकीकत सांगितली. मुलगा असल्याने पुत्र प्रेमापोटी सुनील कोटमे व पुत्र कार्तिक या दोघांनी पुन्हा मलनिस्सारण केंद्राजवळ जाऊन सदरचा मृतदेह दिसू नये म्हणून झाडाझुडपात लपवला. तसेच मृतदेहावर सिमेंटकाँक्रेट टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गायकवाड यांची दुचाकी सुद्धा जवळच पालापाचोळा घेऊन झाकून ठेवण्यात आली.
यानंतर हा सर्व गुन्हा कबूल केल्याचे दोघा पिता-पुत्रांनी पोलिसांना सांगितले. केवळ पुत्र प्रेमापोटी सुनील कोटमे यांनी आपला मुलगा कार्तिक अडचणीत येऊ नये म्हणून त्याला मदत केली. परंतु, आता दोघांनाही पोलिसांच्या कोठडीत जावे लागले. या दोघांनाही आज न्यायालयात उभे केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी रिक्षा तसेच दुचाकी गाडी एक मोबाईल असा सुमारे एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
दरम्यान, नाशिकरोड पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790