नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतांना केली अटक !
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली कॅम्प भागात राहणाऱ्या एका माजी सैनिकाला शेअर मार्केटमध्ये खात्रीशीर ४ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना वर्षभरापूर्वी घडला होती.

या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा माग काढत शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने गोव्याची राजधानी पणजी शहरामधून त्यास ताब्यात घेतले. युवराज बाळकृष्ण पाटील (४२, रा. बेळगाव, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी माजी सैनिक संजय बिन्नर यांच्यासह एका साक्षीदाराकडून आरोपी युवराजने मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत शेअर मार्केटमधील त्याचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखविले व स्वतः ब्रोकर असल्याचे सांगितले होते.
फिर्यादीकडून १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात युवराजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
फिर्यादी हे माजी सैनिक असून, त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्याचा तपासाला वेग देऊन आरोपीला शोध घेत अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे आदींच्या पथकाने युवराजचा शोध घेण्यास सुरुवात केली.
आरोपी आपला ठावठिकाणा सातत्याने विविध राज्यांमध्ये बदलत असल्याचे लक्षात आले. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पथकाने पणजी गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथील शांतिनेझ चर्चजवळ सापळा रचून युवराजला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण ७ मोबाइल, पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यास नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले आहे.
🚨 वेशांतर करून ओळख लपवायचा
कर्नाटक, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात वेशांतर करून युवराज पाटील वावरत होता. फिरस्ता आरोपी म्हणून याला घोषित करण्यात आले होते. एक वर्षांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.
तो सतत ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांच्या हाती येत नव्हता. युवराज पणजीतून थेट नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. तत्पूर्वीच त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
![]()


