नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील कॉलेज रोडच्या लिंकरोडवरील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. नाशिकमधील प्रसिद्ध बिल्डर जीतूभाई ठक्कर यांच्या घराबाहेर ही वस्तू आढळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून या बॉम्ब सदृश्य वस्तूला नष्ट करताना यामध्ये एक प्लॉस्टिकच्या एका लहान बॉलमध्ये फटाक्याची दारु आणि त्यामध्ये वात भरलेली होती.
त्यामुळे हा गावठी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. हा गावठी बॉम्ब शोध पथकाच्या साहेबराव नवले यांनी निकामी केला आहे. या बॉम्बमध्ये कोणत्याही प्रकारचा धातू किंवा घातक स्फोटक मिश्रित घटक नसल्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे या स्फोटकाची तीव्रता एका फटाक्यापेक्षा जास्त नसल्याचे समोर येत आहे. हे स्फोटक याठिकाणी कोणी ठेवले किंवा हे स्फोटक ठेवण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेत आहे. नाशिकमधील हा परिसर प्रतिष्ठीत मानला जातो.
त्यामुळे हा गावठी बॉम्ब ठेवून दहशत निर्माण करण्याचा हेतू होता का याचाही पोलीस आता शोध घेत आहे. ज्या परिसरात कचरा गोळा करणाऱ्यांना एका व्यक्तीला हा गावठी बॉम्ब आढळून आला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.