3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी
नाशिक (प्रतिनिधी): उपनगर हद्दीतील जयभवानी रोड परिसरातील फर्नांडिसवाडीत १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री जुन्या वादाची कुरापत काढून सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल याच्या घरासमोर बेद टोळीने राडा घालत फायरिंग केली होती. या गुन्ह्यातला बेद टोळीचा शुटर तेव्हापासून पसार असताना, रविवारी (ता. २८) शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून त्यास पुण्याच्या लोणीकंद परिसरात बेड्या ठोकल्या आहे.
बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे (३४, रा. जेतवननगर, उपनगर, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल उज्जैनवाल व मयुर बेद यांच्यात वाद होता. त्यातूनच बेद टोळीने १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री राहुल उज्जैनवालच्या घराबाहेर आरडाओरडा करीत त्याच्या कुटूंबियांच्या दिशेने जीवे ठार मारण्याच्य उद्देशाने गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केले होते. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु यातील संशयित शुटर बारक्या तेव्हापासून फरार होता.
शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्य वापरत तपास सुरू केला. संशयित बारक्या शिर्डी, पुणे, गोवा, मुंबई, उज्जैन अशा ठिकाणी चोरीछुप्यारितीने राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक योग्य संधीची वाट पहात असतानाच, संशयित पुण्यातील लोणकंद परिसरात दडून असल्याची खबर अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारीच सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यंवशी, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने पुणे गाठले आणि रविवारी (ता. २८) मोठ्या शिताफीने सापळा रचून सिनेस्टाईल बारक्याला बेड्या ठोकल्या.
अशी केली अटक:
संशयित बारक्या पुण्याच्या लोणीकंद परिसरात लपून होता. गुंडाविरोधी पथकातील अंमलदार वेशांतर करून परिसरातील हॉटेल, लॉज, झोपडपट्टी, पानटपऱ्यांवर संशयित बारक्याचा तपास करीत असताना, तो सायंकाळच्या वेळी एका हॉटेलमध्ये येत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी लोणीकंदमधील कटकेवाडीतील हॉटेलच्या बाहेर सापळा रचला. त्याप्रमाणे बारक्या हॉटेलकडे येताना पथकाला दिसला. परंतु त्यास आसपास पोलीस असल्याच संशय आल्याने त्याने पळ काढला. दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्यास पाठलाग करून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी हे करीत असून संशयित बारक्याला अधिक तपासासाठी त्यांच्या ताब्यात दिले आहे.