कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पंचवटीत एकूण तीन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.
नाशिक (प्रतिनिधी): पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना बाबतच्या आढावा बैठकी दरम्यान शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कार्यवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता महापालिका आणि पोलिस प्रशासन कडक कार्यवाई मोहीम राबवत आहे. सदर कारवाई दरम्यान पंचवटीतील दोन हॉटेल सील करण्यात आले आहे.
नाशकात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे,त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पंचवटी भागातील दोन हॉटेल वर कारवाई करत ही हॉटेल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी भागातील न्यु पंजाब रेस्टो अँड बार ह्या हॉटेलला याआधी दोन वेळेस कोरोना बाबत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्तीक कार्यवाई दरम्यान दंड ठोठावला होता.
मात्र वारंवार न्यु पंजाब रेस्टो अँड बार ह्या हॉटेल चालकाकडून कोरोना बाबतच्या शासन नियमांचं उल्लंघन होत असल्याने महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिस यांनी कारवाई करत सदर हॉटेल पुढील आदेश येई पर्यंत बंद केले आहे.. तर हॉटेल पल्लवीवर देखील महापालिकेने कारवाई करत सील केले आहे
त्याच बरोबर दिंडोरी रोडवरील तारवाला नगर चौक येथील एका बारकडून शासन नियमांचं उल्लंघन होत असल्याने सदर हॉटेलवर 5000 रुपयांचा दंड करण्यात आला. त्यामुळे यापुढे देखील जर कुठल्या आस्थापना, हॉटेल बार चालक यांच्याकडून जर शासन नियम पाळले जात नसेल तर त्यांच्यावर कार्यवाई होऊन संबंधित आस्थापना, हॉटेल, बार आदी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहेत.