नाशिक: ओम्नी कार आणि एर्टिगाचा भीषण अपघात; तीन वर्षीय बालकासह एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी चांदवड जवळील शिरवाडे वणी फाट्यावर भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा याच चौफुलीवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

ओम्नी कार आणि एर्टिगाच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशातच ब्लॅक स्पॉट म्हणून ओळख असलेल्या शिरवाडे वणी फाट्यावर पुन्हा अपघाताची घटना घडली आहे.

रविवारी रात्री मोहन पगार हे नातलगांसह ओम्नी कारमधून नाशिकहून चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे जात होते. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ओमनी वाहन शिरवाडे वणी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना वडनेरभैरव कडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या एर्टीगा कारने ओमनीला जोरदार धडक दिली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

या धडकेत ओमनी कारच्या डाव्या बाजूचा चक्काचुर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात इर्टीगा कारमधील भुसावळ येथील भूषण विठ्ठल धोटे यांच्यासह ओमनी कारमधील देवा सुमित पगार या तीन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान दोन्ही वाहनातील मोहन शंकर पगार, मीना मोहन पगार, सुमित मोहन पगार, कैलास शंकर बराटे, स्वप्निल भगवान चौधरी, मयुरेश सुरेश बराटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरवाडे फाटा चौफुलीवर अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरवाडे फाटा स्पाॅटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लागलीच अपघात स्थळी पोहोचली. यानंतर तातडीने रुग्णांना पिंपळगावला उपचारासाठी हलविण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

महामार्ग चौपदरीकरणात शिरवाडे वणी चौफुलीची रचना अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे. सदोष रचनेमुळे येथे अपघाताची मालिकाच सुरु आहे. पंधरा दिवसापूर्वीच शिरवाडे वणी येथील तीन तरुणांना याच ठिकाणी अपघातात प्राणाला मुकावे लागले होते.

चौफुली की मृत्यूचा सापळा:
दरम्यान पंधरा वर्षांपूर्वी गोंदे ते धुळे महामार्गादरम्यान चौपदरीकरण- सहापदरीकरणाचे काम झाले. विस्तारीकरणामुळे अपघातांचे तांडव थांबेल, अशी अपेक्षा होती. पण, सदोष पद्धतीने महामार्गाचे काम उरकण्यात आले, त्यात वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील अशा शिरवाडे वणी, दहावा मैल यासह दहाहून अधिक ठिकाणांवर अंडरपास काढला गेला नाही. त्यामुळे ही ठिकाणे अपघातस्थळ म्हणून कुप्रसिद्ध आहेत. पंधरा दिवसांपुर्वीच महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरवाडे वणी चौफुलीवर तीन तरुणांचा बळी गेला. त्यावेळी नागरिकांनी आक्रमक होत आंदोलन छेडले होते. त्यावर उपाय योजना न झाल्याने रविवारी पुन्हा याच ठिकाणी चिमुकल्यासह दोघांचा बळी जाऊन अनेक जण जायबंदी झाले. किती मृत्यू झाल्यानंतर प्राधिकरण या ठिकाणी अंडरपासचे काम हाती घेणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790