
नाशिक। दि. २९ जूलै २०२५: श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सोमवारी (२८ जुलै) सुमारे १ लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. रविवारी रात्रीपासूनच शहरातील सर्व निवासव्यवस्था फुल झाल्या होत्या. पहाटे तीनपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सोमवारी मंदिराचे दरवाजे सकाळी ४ वाजता उघडण्यात आले, मात्र त्यापूर्वीच रांगा किमान १ किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या. मुसळधार पावसातही भाविक छत्र्या, रेनकोट व प्लास्टिकच्या कव्हरने अंग झाकून दर्शनासाठी ताटकळत उभे होते. २०० रुपये दर्शन पावती घेणाऱ्यांनाही ३-४ तास प्रतीक्षा करावी लागत होती, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
दुपारी ३ वाजता त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे सुवर्ण मुखवट्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली. कुशावर्त तीर्थावर स्नानपूजा झाल्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात परतली. मात्र, पावसामुळे व छत्र्यांच्या गर्दीमुळे अनेकांना फक्त पालखीवरील छत्राचेच दर्शन झाले.
ब्रह्मगिरी परिक्रमेचा उत्साह:
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त २५ हजार भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा पूर्ण केली. कुशावर्तात स्नान करून त्यांनी पर्वत परिसरात प्रदक्षिणा घातली. गंगाद्वार व अन्य पवित्र स्थळांवरही दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
कपालेश्वर दर्शनासाठी भाविकांची रेलचेल:
नाशिक शहरातील कपालेश्वर मंदिरातही भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यंदा १.०५ लाख भाविकांनी दर्शन घेतले, जी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक होती. सकाळी ५ वाजता मंदिर उघडण्यात आले व रात्री १२ पर्यंत दर्शन सुरू होते. मंदिर प्रशासनाने स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावल्याने काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण ठेवता आले.
या वेळी २५१ किलो विविध फळांची आकर्षक आरास कपालेश्वर मंदिरात सजवण्यात आली होती. दुपारी चारच्या सुमारास पंचमुखी मुखवट्याची पालखी मिरवण्यात आली. भाविकांनी ठिकठिकाणी रंगवलेल्या रांगोळ्यांमधून फुलांची उधळण करत पालखीचं दर्शन घेतलं. रामकुंड येथील अभिषेक सोहळ्याला भाविकांनी विशेष उत्साहात उपस्थिती लावली.
आज वाटण्यात येणार फळांचा प्रसाद:
श्रावणी सोमवारनिमित्त सजवलेल्या २५१ किलो फळांची आरास आज (२९ जुलै) भाविकांना प्रसादरूपाने वाटण्यात येणार आहे.
सोमेश्वर मंदिरातही उत्साह:
गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिरात देखील पहाटेपासूनच २ किमी लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर कायम असतानाही भक्तांच्या श्रद्धेला खंड पडला नाही.