पंचवटीत फरसाण कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा

नाशिक (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील कारवाई सुरूच असून काल सायंकाळी पंचवटीत फरसाण कारखान्यावर छापा टाकून लाख रुपयांचा फरसाण नष्ट करण्यात आला आहे. विनापरवाना व विना लेबल विक्री केल्याप्रकरणी एफडीएने नोटीस देखील दिली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सणासुदीच्या मोहिमेअंतर्गत जनतेस निर्मल व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये सतत कारवाई केली जात आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील विभागाने कारवाई केली आहे.

पंचवटीतील तपोवन रोडवरील यंदे मळा येथील मे. देवीकृपा फुड प्रोडक्ट्स या कारखान्याची तपासणी केली असता कारखान्यामध्ये अनारोग्य परिस्थितीत अन्न पदार्थाचे विनापरवाना उत्पादन व विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने घटनास्थळावरून लसुन फरसाण, मद्रारा फरसाण, लाल शेव, पिवळी शेव, भावनगरी, शेवचे नमुने विश्लेषनासाठी घेऊन उर्वरीत ६५६ किलो ग्रॅम वजनाचा १ लाख ११ हजार ५५० रुपये किंमतीचा साठा जप्त करून साठा उत्पादकाच्या ताब्यात सुरक्षित ठेऊन परवाना नसल्याने उत्पादन व विक्री बंदची नोटीस बजावण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

या मोहिमेत एकूण ५ अन्न नमुने विश्लेषनासाठी घेण्यात आले असून विश्लेषन अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई घेण्यात येईल. अशीच धडक मोहिम ही या पुढेही सुरु राहणार आहे, तरी अन्न व्यावसाईकांनी व फरसाण उत्पादकांनी आवश्यक परवाना घेऊन परिशिष्ट IV अंतर्गत तरतुदीचे पालनकरून व्यवसाय करावा. तसेच उत्पादकांना उत्पादन, साठवणूक, वाहतुक व विक्री आरोग्यदायी वातारणात करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

फरसाण उत्पादकांनी अन्न पदार्थात भेसळ करु नये, भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल तसेच मे. देवीकृपा फुड या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यास ज्या विक्रेत्यांनी कच्चे अन्न पदार्थ विक्री केले आहेत त्याच्यावर देखील नियमानुसार कार्यवाही करण्यात येत असून विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, विनापरवाना व विना नोंदणी अन्न आस्थापनांना अन्न पदार्थांची विक्री करू नये.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

नागरीकांनी प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, फरसाण खरेदी करताना लेबलवरील मजकुर तपासुन खरेदी करावे व पक्के बिल घ्यावे. भेसळयुक्त फरसाण किंवा इतर अन्न पदार्थ संबधि माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कार्यवाही नाशिक विभागीय सह आयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनिष सानप सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर व अविनाश दाभाडे (गुप्त वार्ता शाखा) यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790