नाशिक (प्रतिनिधी): सातपूर- त्र्यंबकेश्वर रोडवरील श्रीराम चौकात ‘नो हॉकर्स झोन’ परिसरातील दोन फळ विक्रेत्यांवर आठ ते दहा हल्लेखोरांनी चॉपरने वार केल्याची घटना बुधवारी दिनांक 14 रोजी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.
या हल्ल्यात फळ विक्रेते अखिल कुमार साहू व संतोष कुमार साहू (राहणार सातपूर कॉलनी) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
फळ विक्रेते अखिलकुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दुकान बंद करण्याच्या वेळेस सात ते दहा तरुणांनी येत अखिल कुमार साहू व संतोष कुमार साहू यांच्या तोंडावर व डोक्यावर काही कळायच्या आत चॉपरने वार केले.
तसेच त्यांनी फळांची गाडी देखील पलटी करून साहित्याचं नुकसान केले. अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेल्या साहू बंधूने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे फळ विक्रेते लगेच धावून आल्याने हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले .या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत