नाशिक (प्रतिनिधी): कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त निधीची बचत करण्याच्या दृष्टिने मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दोन दिवसांवर येऊन ठेपलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून महापालिकेच्या आवारात पुष्पोत्सवाची तयारी सुरू होती.
महापालिकेत १९९२ पासून सुरू असलेली पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने महापालिकेच्या मुख्यालयात (राजीव गांधी भवन) टेबल सजवण्यात येत होते. मुख्यालयाबाहेर दोन मंडपांची उभारणी करण्यात आली.
कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन होते. मुख्य इमारत फुलांनी सजविण्याची तयारी सुरू होती. आयुक्त मनीषा खत्री यांच्यापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही महिन्यावर असताना पुष्पोत्सव रद्द केला होता. आयुक्त मनीषा खत्री यांचे आदेशानुसार कुंभ मेळ्यासाठी मनपाचा हिस्सा पुढील वर्षामध्ये राखून ठेवायचा असल्याने तसेच बजेट मधील तूट लक्षात घेता अत्यावश्यक खर्चाला प्राधान्य देऊन काटकसरीने धोरण अवलंबवायचे असल्याने पुष्प महोत्सव ही अत्यावश्यक बाब नाही त्यामुळे रद्द करण्यात येत आहे असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.
४९ लाखांची तरतूद:
कार्यक्रमासाठी हास्यजत्रा फेम कलाकार पुष्पोत्सवास उपस्थित राहणार होते. यंदाचा पुष्पोत्सव भव्य स्वरुपात साजरा केला जाणार होता. पुष्पोत्सवासाठी ४९ लाखाची तरतूद करण्यात आली. परंतु सदर फाईलवर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नव्हती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला.