नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोमवार (दि. 24) पासून पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत नाशिक-मुंबई महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील 6 दिवस जुना कसारा घाट बंद असणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून सोमवार (दि. 24) ते गुरुवार (दि. 27) या दरम्यान तसेच 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे.
वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवणार:
या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागणार आहे. तसेच, जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत.
अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी:
जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद असणार असल्याने लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर अवजड वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या मार्गे वळविण्यात येणार आहेत.
नवीन कसारा घाटात मदत केंद्र उभारली जाणार:
कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि त्यामुळं वळवण्यात येणारा मार्ग लक्षात घेता मुंबई-नाशिक-शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम ही नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार आहे. तसेच नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मदत केंद्र उभारली जाणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.