मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

नाशिक। दि. १ जून २०२५: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे), शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून गेल्या २ वर्षात शासकीय १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या २५ वर्षात चांगले काम केले आहे.
वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे:
परदेशी विद्यापीठे ज्याप्रकारे काम करतात, तसेच काम येथील विद्यापीठांनी करावे. विद्यापीठात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहे, वेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम केले पाहिजे. उत्कृष्टता केंद्र, ईन्क्यूबेशन केंद्र, स्टार्ट अप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
देशात नवीन शिक्षण धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणले. समाजाची गरज आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा धोरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेलं ‘चक्र’ हे त्याचेच उदाहरण असल्याचे फडणवीस म्हणाले.
सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे संशोधन व्हावे:
‘चक्र’सारखे मॉडेल आणि हब अँड स्पोक ही पद्धती महत्वाची आहे. मागच्या काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर आयआयएम सोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जगातल्या विद्यापिठाप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत. त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. मोठे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायभूत सुविधांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. राज्यातील १३ कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबीकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी:
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिजिटल कुंभ सोबतच आरोग्यदायी कुंभ अशी संकल्पना राबवून यामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात राज्य शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्र विषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल श्रीमती कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पानुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790