नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी योग्य अर्थिंग, इन्सुलेटेड वायरचा उपयोग करावा. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाकडून करण्यात आले आहे. जीवनामध्ये विजेचे महत्त्व व फायदे अत्यावश्यक आहे. मात्र, सावधानता बाळगली नाही तर नुकसानही होऊ शकते.
सध्या पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे. विजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी.
आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणाऱ्या विजतारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी असे आवाहन महावितरणातर्फे करण्यात आले आहे. यासह पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये.
अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. वीज उपकरणे हाताळतांना पायात स्लीपर, चप्पल घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी. घर, उद्योग, कार्यालय, शेती असो वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल स्विच अथवा इतर उपकरणे ही आयएसआय प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये.
येथे साधा संपर्क:
वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे.अशा तक्रार देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरु असणाऱ्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे ॲप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाईलवरून महावितरणच्या ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तक्रार नोंदविल्या जाईल.