
नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२५: महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांकरीता अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसंदर्भात संवाद साधण्यासाठी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या निर्देशानुसार नाशिक परिमंडल कार्यालयांतर्गत नाशिक, अहिल्यानगर व मालेगाव मंडळ तसेच संगमनेर विभागीय कार्यालय येथे नुकतीच मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली.
नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि कोकण प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुशील पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. महावितरण मधील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांकरिता अनुकंपा तत्त्वावरील नोकरी संदर्भातील शंका, अडचणी व तक्रारी दूर करीत या शिबिरात थेट संवाद साधण्यात आला.
नाशिक मंडळ कार्यालयातर्फे आयोजित शिबिरास अधिक्षक अभियंता राजेश थूल, नाशिक परिमंडळाचे सहायक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, नाशिक मंडळ व्यवस्थापक सुधा वाजपेयी तर मालेगाव मंडळ कार्यालय येथे नाशिक परिमंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद फुलकर, व्यवस्थापक सुदीप साळवे, अहिल्यानगर मंडळ कार्यालय येथे व्यवस्थापक रेणुका सूर्यवंशी तर संगमनेर विभाग येथे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच सर्व अवलंबितांना महावितरणची अनुकंपा तत्त्वाबाबतची माहिती पुस्तिका देण्यात आली. शिबिरास उपस्थित सर्व विभागीय कार्यालयांचे उपव्यवस्थापक (मानव संसाधन) यांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या शिबिराला नाशिक , मालेगांव आणि अहिल्यानगर मंडळ आणि संगमनेर विभाग कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर पात्र उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.