महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

नाशिक/मुंबई, दि. २९ डिसेंबर २०२५: वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे.

जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ लिव्हिंग) महावितरणने वीज ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन द्याव्यात जेणेकरून वीज ग्राहकांना घरबसल्या सुविधांचा लाभ घेता येईल व त्यांना कार्यालयात जावे लागणार नाही, असा प्रयत्न चालू आहे. त्यानुसार महावितरणने वीज कनेक्शन नावात बदल आणि मंजूर भार बदल यासाठी ऑनलाईन व झटपट सुविधा उपलब्ध केली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

खरेदी – विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल अॅप अथवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजग्राहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करता येतो. ग्राहकाला कोणत्या कारणासाठी नाव बदलणे आवश्यक आहे त्याचा पर्याय निवडला की, त्यानुसार आवश्यक ते निवडक दाखले जोडावे लागतात. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर तीन ते सात दिवसात नावातील बदलाची प्रक्रिया पूर्ण होते.

महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला आहे. या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आता १०,४२८ झाली आहे व त्यांनी ६९.३७ मेगावॅट भार वाढवून घेतला आहे. अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये (Load Change/Demand Change) वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर ग्राहकांना उपलब्ध आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

वीज भार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदविल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येते. वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होतो व केवळ २४ तासांत कार्यान्वित होतो. वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येतो. अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येतो. नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणी देखील साधारणतः ४८ तासांमध्ये वीज भार वाढीची प्रक्रिया पूर्ण होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

लघुदाब वर्गवारीमध्ये वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजूरी देण्याच्या निर्णयामुळे प्रामुख्याने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहकांना तसेच प्रामुख्याने औद्योगिक, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा लाभ होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790