नाशिक परिमंडळात स्मार्ट टीओडी मीटर असलेल्या १ लाख ४२ हजार घरगुती ग्राहकांना स्वस्त वीजदर

नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२५: १ जुलै २०२५ पासून महावितरणच्या टीओडी स्मार्ट मिटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीज बिलात टीओडी सवलत लागू झाली असून, नाशिक परिमंडळातील एकूण १ लाख ४२ हजार ६०८ स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना अनुक्रमे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळून एकूण ३० लाख ८३ हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाली आहे.

महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. १ जुलैपासून सुरु झाला असून महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: फुल बाजारात युवकावर दगडाने हल्ला

दरम्यान, नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होणार असल्याने अचूक बिले मिळतील आणि घरातील विजेचा वापर दर अर्धा तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे वीज वापरावर देखील थेट नियंत्रण राहणार आहे. तर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीज दराचा प्रस्ताव मा. आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात दि. १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, सन २०२७ मध्ये ८५, सन २०२८ व २९ मध्ये ९० पैसे तसेच सन २०३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आनंददायी आणि सुरक्षित कुंभकरीता प्रशासन प्रयत्नशील- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर…

महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार आहे. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790