नाशिक। दि. १४ ऑक्टोबर २०२५: महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली असून या पुर्नरचनेनुसार कार्याला नाशिक परिमंडलात सोमवारपासून सुरवात झाली आहे. ग्राहकसेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये आणखी सुसूत्रता येणार आहे. त्यांच्यावरील कामांचा ताण कमी होणार असून ग्राहकांना अधिक तत्परतेने महावितरणची सेवा मिळणार आहे.
अशी आहे पुनर्रचना : महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये कोणताही बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या पथकाकडे राहणार आहे. तसेच प्रत्येक विभागात सध्या अस्तित्त्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात येईल.
म्हणजे एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग राहतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुली ही कामे करणार आहेत. शहरी भागातील शाखा कार्यालयांमध्ये पुर्नरचनेत फेरबदल करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीत अंशतः बदल करण्यात आला आहे.
या पुनर्रचनेमुळे महसूल व देयकांच्या ग्राहकसेवेसाठी तसेच सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपविभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामे एकाचवेळी करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत (फोकस) पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामे करता येईल. कामाचे नियमानुसार तास निश्चित होतील व कामाचा ताण देखील कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. पर्यायाने वीजग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होणार आहे.
नाशिक मंडळातील शहर विभाग क्रमांक १ व २ अंतर्गत असलेल्या नाशिकरोड उपविभाग (विद्युत भवन), पाथर्डी उपविभाग (पाथर्डी फाटा) गंगापूर १ उपविभाग (सातपूर एमआयडीसी), नाशिक ग्रामीण उपविभाग (शिंदेगाव), नाशिक ग्रामीण उपविभाग (त्र्यंबक), सातपूर उपविभाग (शरणपूर रोड) आणि नाशिक शहर उपविभाग (भद्रकाली) हे सर्व उपविभाग कार्यालय संचलन व सुव्यवस्था (देखभाल व दुरुस्ती) उपविभाग म्हणून कार्य करणार आहेत.
तसेच देवळाली उपविभाग (मुक्तिधाम मागे), द्वारका उपविभाग (तीगरानीया रोड), गंगापूर २ उपविभाग (सातपूर एमआयडीसी), सिडको उपविभाग (सिडको) आणि पंचवटी उपविभाग (दिंडोरी रोड) हे सर्व उपविभाग देयक व महसूल उपविभाग म्हणून निर्माण करण्यात आलेले आहेत. तर ग्रामीण भागातील कार्यालयांच्या रचनेत कसलाही बदल न करता केवळ मनुष्यबळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. महावितरणची कक्ष कार्यालये सुद्धा पूर्वीप्रमाणेच सुरू असून ग्राहकांना कुठलीही अडचण वा तक्रार असल्यास या कार्यालयात उपस्थित कर्मचारी यांचेकडून योग्य माहिती व मदत मिळणार आहे.
ग्राहकांनी वीजपुरवठ्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांसह महावितरणच्या मोबाईल ॲपवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790