नाशिक (प्रतिनिधी): सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यातच महावितरणच्या नाशिक परिमंडळात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर वीज बिलावरील नावात बदलाचे प्रलंबित ६६४ अर्ज कार्यवाही झाली असून तसेच महावितरण पोर्टलवरील वीज ग्राहकांचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा अंमलात आणला आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी परिमंडळात सेवा पंधरवड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत.
२८ एप्रिल ते १२ मे दरम्यान सेवा हक्क पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषतः नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल व दुरुस्ती तसचे विविध तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार नाशिक परिमंडळात नवीन वीजजोडणीचे १ हजार ९८० अर्ज प्रलंबित होते. यातील १ हजार ४९२ अर्जदारांना सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यातच नवीन वीजजोडणी देण्यात आली असून उर्वरित ५७८ अर्जावर कार्यवाही सुरू आहे.
तर वीज बिलावरील नावात बदल करण्याबाबतच्या ६८९ अर्जापैकी ६६४ अर्जावर कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. महावितरणच्या पोर्टलवर आलेल्या ५२२ ऑनलाइन अर्ज अथवा तक्रारींपैकी ३५५ प्रकरणांचे निवारण करण्यात आले आहे. उर्वरित १६७ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.