स्वीकारलेल्या जबाबदारीचे गांभीर्यपूर्वक पालन करावे- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी

नाशिक। दि. २४ डिसेंबर २०२५: प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांसाठी दीक्षांत संचलन समारंभ आयुष्यातील महत्वाचा व अविस्मरणीय असा दिवस आहे. आज घेतलेल्या शपथेव्दारे जी जबाबदारी आपण स्वीकारली आहे. ती अत्यंत महत्वाची असून त्याचे सर्वजण निश्चितपणे गांभीर्यपूर्वक पालन करतील. असा आशावाद नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र १२६ मधील ३२२ पुरुष व ६७ महिला असे एकुण ३८९ सरळसेवा प्रशिक्षणार्थी यांचे मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा दीक्षांत संचलन समारंभ आज सकाळी ९.३० वाजता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथील मुख्य कवायत मैदान येथे संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी प्रशिक्षणार्थीकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली तसेच सत्राचे अहवाल वाचन केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी पुढे म्हणाले की, प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत दाखल होत असलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी आजचा हा दीक्षांत समारंभ आपल्या आयुष्यातील महत्वाचा व अविस्मरणीय असा दिवस आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे या पोलीसांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावण्याकरीता तरूण व उत्साही असे अधिकारी राज्य पोलीस दलात प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात दाखल होत आहेत. आज घेतलेल्या शपथेव्दारे जी जबाबदारी आपण स्वीकारली आहे. ती अत्यंत महत्वाची असून त्याचे निश्चितच गांभीर्यपूर्वक आपण पालन कराल, अशी आशा बाळगतो. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून तंत्रज्ञान जसजसे विकसीत होत आहे त्याप्रमाणात सायबर व आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा गुन्ह्यांना हाताळणेकरीता पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे ठरते. त्याकरीता आपण कालसुसंगत ज्ञान नेहमी आत्मसात करत राहिले पाहिजे. सध्या समाजात शालेय स्तरापासून अंमली पदार्थांचा होणारा मोह ही पोलीसांसमोरील महत्वाची आव्हाने आहेत. याविषयावर जनजागृती तसेच कठोर कारवाई करावी.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, नक्षलग्रस्त भागातील काम करणारे पोलीस घटक यांची आजवरची कामगिरी निश्चीत उल्लेखनीय आहे. तसेच गुन्हे प्रतिबंध, गुन्हे अन्वेषण तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकामी जनतेचा सहभाग हा नेहमीच आवश्यक असतो. जनता व पोलीस यामध्ये सुसंवाद राखण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यरत राहणं महत्वाचे आहे. त्याचबरोबर पोलीस कारवाई दरम्यान मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेणं अत्यंत गरजेचे आहे. जनताभिमुख काम करतांना पोलिसांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पड़ता निष्पक्ष व पारदर्शक कारभार करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. पोलीस दलातील खडतर कर्तव्य पार पाडतांना पोलीस अधिकारी हा शरीराने व मनाने खंबीर असला पाहिजे, त्याकरीता नियमीत व्यायाम, योग्य आहार, व्यसनांपासून अंतर व छंदांची जोपासना याकडे लक्ष दिले पाहिजे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

याकामी तुमच्या कुटुंबियांची साथ ही मोलाची ठरत असते. सर्व उपस्थित कुटुंबियांचं अभिनंदन करुन या अधिकाऱ्यांना नविन भूमिकेमध्ये काम करतांना कुटूंबाच्या पाठिब्यांची जास्त गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आजचे संचलन यशस्वी करण्यामागे प्रशिक्षणार्थी समवेतच महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अधिकारी व कर्मचारी यांची मेहनत प्रकर्षाने दिसून येते. याकरीता येथील सर्व प्रशिक्षक व अधिकारी यांचं अभिनंदन करुन उत्तरोत्तर प्रभावी कार्य करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक, सहसंचालक यासह अकादमीच्या सर्व अधिकारी व प्रशिक्षक वर्गास शुभेच्छा दिल्या. तसेच आज दीक्षांत संचालन झालेले हे ३८९ निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक कोठेही कमी पडणार नाहीत असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र १२६ मधील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विविध पारितोषिक प्राप्त प्रशिक्षणार्थीचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

यांचा झाला सन्मान:
सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर (Revolver of Honour) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रियांका शामला शांताराम पाटील या प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. Best Trainee of the Batch व सर्वोकृष्ट महिला प्रशिक्षणार्थी पुरस्कार प्रियांका शामला शांताराम पाटील या प्रशिक्षणार्थीस मिळाला, तसेच दिपक अंत्याबाई बालाजी घोगरे यास व्दितीय सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी कवायत म्हणुन वैभव लक्ष्मी प्रभाकर डोंगरे, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी कायदा व अभ्यासक्रम प्रियांका शामला शांताराम पाटील, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी-गोळीबार पवन रेखा दिलीप गोसावी, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी बाह्यवर्ग दिपक अंत्याबाई बालाजी घोगरे यांना सन्मानित करण्यात आले. हा दीक्षांत संचालन कार्यक्रम युटयुब लाईव्ह प्रसारीत करण्यात आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्रीमती रश्मी शुक्ला, नवल बजाज, संचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक, श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली श्री अरविंद साळवे (सह संचालक), उपसंचालक (प्रशासन) श्री संजय बारकुंड, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) श्रीमती अनिता पाटील, उपसंचालक (बाहयवर्ग) श्री प्रशांत खैरे, उपसंचालक (प्रशिक्षण) श्रीमती गीता चव्हाण, उपसंचालक (सुरक्षा व आयटी) श्रीमती पद्मजा चव्हाण आणि महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790