शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा
नाशिक(प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या आंदोलनानंतर प्रभाग क्रमांक २४ मध्ये रस्ते खडीकरणाला सुरुवात झाली आहे. अन्य भागातही हे काम लवकरच करण्यात येणार आहे.
गॅस पाईपलाईनमुळे रस्ते खोदल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंगलमूर्तीनगरमध्ये तर रस्तेच पाणी व चिखलात गेले आहेत.
मंगलमूर्तीनगर, गोविंदनगर, जगतापनगरसह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये गॅस पाईपलाईनने उखडलेल्या रस्त्यांचे खडीकरण करावे, या मागणीसाठी शुक्रवारी, ३० जून रोजी गोविंदनगर येथे शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांच्यासह रहिवाशांनी भर पावसात निदर्शने केली. या आंदोलनानंतर मंगलमूर्तीनगर भागात रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्याचे, चिखल हटविण्याचे व खडीकरणाचे काम सुरू झाले आहे. येथील काम झाल्यानंतर अन्य भागातही खडीकरण करण्यात येईल, असे शहर अभियंता नितीन वंजारी यांनी सांगितले.