प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२५ (खात्यांतर्गत सरळ सेवा) चा दीक्षांत समारंभ

नाशिक (प्रतिनिधी): पारंपरिक गुन्ह्यांच्या तपासाबरोबरच सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचे आव्हान पोलिस दलासमोर आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञानाची नवनवीन दालने खुली झाली आहेत. त्याची अद्ययावत माहिती आपण ठेवत सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांबाबतचे विशेष ज्ञान प्राप्त करून घेत पारंगत व्हावे, असे प्रतिपादन दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज यांनी येथे केले.

महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे आज सकाळी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२५ (खात्यांतर्गत सरळ सेवा) चा दीक्षांत समारंभ अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अकादमीचे संचालक राजेशकुमार, उपसंचालक संजय बारकुंड, अनिता पाटील आदी उपस्थित होते. संचालक राजेशकुमार यांनी प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली. अपर पोलिस महासंचालक बजाज यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक दलाच्या तुकडीची पाहणी केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षकांच्या तुकडीने संचलन केले. परेड कमांडर चंद्रकांत जाधव यांनी संचलनाचे नेतृत्व केले.
अपर पोलिस महासंचालक बजाज म्हणाले की, गुन्ह्यांचा तपास कायद्यानुसारच व्हावा. तपासाचा मुख्य उद्देश घडलेल्या घटनेचे सत्य शोधून काढणे आणि गुन्हा करणाऱ्यास गुन्हेगाराविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे हाच असला पाहिजे. आपण वस्तूस्थितीप्रमाणेच तपास केला, नेमके आरोपी शोधले, तर पीडितांना न्याय मिळतो. त्यामुळे असे गुन्हेगार परत गुन्हे करण्यास धजावत नाहीत. गुन्हे प्रतिबंध होऊन आरोपीला योग्य शासन होईल, अशा प्रकारचा तपास करावा.
पोलिसांसाठी कम्युनिटी पोलिसिंगचे महत्व अनन्य साधारण आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी समाजातील विविध घटकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या घडामोडींची माहिती होते. याच संपर्कातून अनुचित घटनांचा वेळीच प्रतिबंध करण्यास मदत होते. त्याबरोबरच पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यास मदत होते, असेही अपर पोलिस महानिरीक्षक श्री. बजाज यांनी सांगितले. अकादमीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचन केले.
१११ पोलिस उपनिरीक्षक यांचे प्रशिक्षण:
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२५ (खात्यांतर्गत सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र २९ जानेवारी २०२४ पासून सुरू झाले. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून निवड झालेले १०८ पुरुष आणि तीन महिला प्रशिकणार्थी यांचा समावेश आहे. एकूण १११ पोलिस उपनिरीक्षक यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणार्थीपैकी ७८ टक्के पदवीधर, तर ८ टक्के पदव्युत्तर पदवीधारक आहेत. नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांना आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राइम, गुन्हेगारी शास्त्र तसेच बाह्य वर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव, योग आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
पुरस्कारार्थी असे:
बेस्ट कॅडेट इन ड्रील- चंद्रकांत उत्तम जाधव, डॉ. बी. आर. आंबेडकर कप बेस्ट कॅडेट इन लॉ- चेतनलाल धनुलाल पटले, एन. एम. कामटे गोल्ड कप बेस्ट कॅडेट इन रायफल ॲण्ड रिव्हॉल्वर शूटिंग- केशवसिंग जारवाल, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ऑल राऊंड कॅडेट इन द बॅच- चेतनलाल पटले, अहिल्याबाई होळकर कप ऑल राऊंड वुमेन कॅडेट इन द बॅच- अयोध्या प्रकाश घोरपडे, सेकंड बेस्ट इन द ट्रेनी बॅच- सुनील अमृत भामरे, बेस्ट कॅडेट इन द स्टडी- चेतन पटले, बेस्ट कॅडेट इन आऊटडोअर – केशरसिंग जारवाल, रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर, बेस्ट ट्रेनी इन द बॅच – चेतन पटले.
![]()


