नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील मिळकतधारकांनी आपली मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यावसायिक गाळे आदींची थकबाकी त्वरित भरावी अन्यथा मार्चअखेरनंतर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा नाशिक महापालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांनी दिला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारचे मालमत्ता कर पाणीपट्टी व्यावसायिक गाळे आदींची थकबाकी स्वीकारण्यासाठी सुटीच्या दिवशीदेखील कार्यालय सुरू राहणार आहे. केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोग मार्गदर्शक सूचनेनुसार मालमत्ता, पाणीपट्टी, व्यावसायिक गाळे यांची १०० टक्के वसुली होणे गरजेचे आहे.
शहराच्या विकासात व शहरातील मोठ्या प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती, आगामी होणारा सिंहस्थ कुंभमेळा शहरासाठी रिंगरोड आदी सर्व बाबी पंधराव्या वित्त आयोगात समाविष्ट असून, शहराच्या विकासासाठी वसुली पूर्ण झाल्यानंतर शासन मनपास अनुदान देणार आहे.
या सर्व बाबींचा विचार करता, सर्व थकबाकीदारांनी थकबाकी भरून मनपास सहकार्य करावे व नाशिक शहराच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे.
पाणीपुरवठा खंडित:
ज्या नळ कनेक्शनधारकांनी त्यांची थकबाकी अद्यापपर्यंत भरली नाही, त्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही मनपाकडून सुरू राहणार आहे. या थकबाकीदारांनी त्यांची थकीत पाणीपट्टी त्वरित भरून नाशिक महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उपयुक्त कर संकलन यांनी केले आहे.