
नाशिक। दि. २८ ऑगस्ट २०२५: नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दुपारी साधू- महंतांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. कुंभमेळ्यासाठी होणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण केली जातील. साधू- महंतांच्या अडी- अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भक्तीधाम येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विविध आखाड्याचे साधू- महंतांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते भक्तीचरणदास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे रामशरणदास महाराज, महंत माधवदास राठी, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्यानिमित्त विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, अशी दक्षता घेण्यात येईल. जिल्हा प्रशासन साधू- महंतांशी नियमितपणे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेईल. तसेच त्यांच्या सुचनांची दखल घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. साधूग्रामसाठी आवश्यक भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. तसेच लवकरच त्र्यंबकेश्वर येथील साधू- महंतांशी संवाद साधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी साधू-महंत यांनीही काही मौलिक सूचना केल्या. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.