
नागपूर। २२ जून २०२५: नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला.
कुंभमेळाप्रती भाविकांची वाढती आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्वसंबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह अरुणराजे अभयसिंहराजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे आमदार मंगेश चव्हाण, सडक परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिकला जवळपास महत्त्वाचे आठ मार्ग येतात. यात मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कुंभच्या काळात जी काही प्रचंड मोठी ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रस्त्यांचे जाळे यातून उपलब्ध होणार असल्याने भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्याने द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला. यात कुंभ पर्यंत होणारे काम व कुंभ नंतर हाती घ्यावयाचे काम असे दोन टप्पे ठरविण्यात आले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790