नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखडासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
दोन वर्षांवरील कामांसाठी अंदाज पत्रक तयार करावे:
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा कक्षासाठी प्राथमिक स्वरूपाचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यात अधिकारी व कर्मचारी यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. कुंभ कक्षासाठी लागणाऱ्या अनुषंगिक बाबी व सोयी-सुविधांसाठी प्रस्ताव तयार करून आगामी काळात आवश्यक फेरबदलासह तो पूर्णत्वास येईल. सिंहस्थ कुंभमेळासाठी विविध विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावात नमूद कामांपैकी ज्या कामांसाठी दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे, ती कामे त्वरीत सुरू करण्याचे निर्देश देतानाच अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.
मोबाईल कंपन्यांसमवेत संवाद साधावा:
रामकालपथसाठी सल्लागार यांच्याशी चर्चा करून अंतिम निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. नाशिक व त्र्यंबकेश्वर व शहरालगतचे महामार्ग येथे कुंभमेळा काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोबाईल डाटा वापर वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करून कुंभमेळा कालावधीत इंटरनेट सेवा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने टॉवरची संख्या वाढविणे, इंटरनेट डाटा क्षमता वाढविण्याबाबत चर्चा करून नियोजन करावे, अश्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी बैठकीत दिल्या.