नाशिक: कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत- छगन भुजबळ

नाशिक, दि. २१ ऑगस्ट २०२५: कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करतानाच ती वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते, तर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त तथा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव करिश्मा नायर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या.

👉 हे ही वाचा:  नाशिक: स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत !

मंत्री भुजबळ म्हणाले की, नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. याबरोबरच पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीबरोबर कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करावे. महानगरपालिका आणि पोलिस दलाने वाहतुकीचे नियोजन करावे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू

नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण करावे. समृध्दी महामार्गाला इगतपुरी हून असलेल्या इंटरचेंज रस्त्याचे काम पूर्ण करावे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी यापूर्वी केलेल्या रिंगरोडसह अन्य रस्त्यांचे बळकटीकरण करावे. कुंभमेळ्यासाठी बाहेरुन येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील अन्य अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देता येईल यादृष्टीने नियोजन करावे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषण रहित राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची संख्या लक्षात घेऊन नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाटांचा विकास करतानाच यापूर्वी बांधलेल्या घाटांची दुरुस्ती करावी. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा, अशाही सूचना मंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या
.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ, पर्यावरण पूरक होण्यासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. दीर्घ कालावधी लागणारी कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची, श्रीमती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची, पोलिस अधीक्षक पाटील, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790